FAQ’s मराठी मध्ये

मेळघाट कोठे आहे?

‘मेळघाट’ हा अमरावती जिल्ह्याचा उत्तरेचा भाग. संपूर्ण जंगल असलेला हा भाग चिखलदरा आणि धारणी या दोन तालुक्यात विभागलेला आहे. एकूण ४०५० स्क्वे. किलोमीटरच्या या जंगलाच्या प्रदेशात कोरकू आदिवासींची वस्ती आहे. यापैकी ७२६ स्क्वे. किलोमीटर एवढा प्रदेश व्याघ्र प्रकल्प म्हणून ओळखला जातो. दोन लाख ऐंशी हजार लोकसंख्या असलेल्या या भागात आदिवासींची एकूण ३२२ गावे आहेत. त्यांची भाषा ’कोरकू’ ही आहे.  

 “मैत्री” (मेळघाट मित्र)ची स्थापना कशी झाली?

१९९७ साली पावसाळ्यात बालमृत्यू आणि कुपोषणाच्या खुप बातम्या वृत्तपत्रामधे आणि दूरदर्शनवर येत होत्या. त्यावेळी महाराष्ट्रातील काही लोकांनी त्याची शहानिशा करायची ठरविले. त्यांनी सर्व मेळघाट पायी फ़िरुन पाहीला. त्यावेळी बालमृत्यू आणि कुपोषणाचा प्रश्न खुप गंभीर आहे असे दिसले. त्यांनी त्या वर्षीच्या पावसाळ्यात महाराष्ट्रातील स्वयंसेवकांना मेळ्घाटात येऊन काम करण्याचे आवाहन केले. त्यावर्षी २६५ स्वयंसेवक मेळ्घाटात आले. त्यामधे डॉक्टर्स, पत्रकार, बॅंक मॅनेजर्स, विद्यार्थी, समाजसेवक, वकील या क्षेत्रातील लोकांचा सहभाग होता. खरी मेळ्घाट मित्रची सुरुवात ही अशी झाली. त्यानंतर पूर्णवेळ काम करणारे कार्यकर्ते आले आणि त्यांनी मेळघाटच्या प्रश्नांसाठी काम करायला सुरुवात केली. ”एकही बालमृत्यू होऊ द्यायचा नाही” हा एकमेव उद्देश डोळ्यापुढे होता. सुरुवातीस पाच गावांत सुरु केलेले काम आता अठ्ठावीस गावात जाऊन पोहोचले आहे. संस्थेला सर्व कायदेशीर बाबी, हिशोब ठेवाव्या लागतात. यासाठी “मैत्री” या नावाचा न्यास स्थापन करण्यात आला आहे. 

मेळघाटातच बालमृत्यू आणि कुपोषण का होते?

मेळघाटात बालमृत्यू आणि कुपोषणाचा प्रश्न आपण अनेक वर्षापासुन ऎकतो आहोत. दरवर्षी शेकडो बालके वयाची पाच वर्षे पूर्ण व्हायच्या आतच मृत्यूमुखी पडतात आणि तेवढीच कुपोषणाच्या अतिगंभीर श्रेणीमधे जीवन आणि मृत्यूच्या काठावर असतात. बालमृत्यूची अनेक कारणे आहेत. त्या अनेक कारणापैकीच कुपोषण हे एक कारण आहे. आमच्या आजपर्यंतच्या पाहणीनुसार मेळघाटात जेवढे बालमॄत्यू होतात, त्यापैकी साठ टक्के बालमृत्यू वयाचे अठ्ठावीस दिवस पूर्ण व्हायच्या आतच होतात. कमी वयात म्हणजे अठरा वर्षाच्या आत मुलीचे लग्न करणे, कमी दिवसाचे आणि कमी वजनाचे बाळ जन्माला येणे, ही कारणे शासकिय स्तरावर पुढे केली जातात. काही अंशी ती बरोबरही आहेत. पण, गरोदर स्त्रियांची वेळेवर नोंदणी न करणे, लसीकरण करण्यास विलंब करणे, शासनाकडून त्यांना मिळणारी मदत त्यांच्यापर्यंत न पोहोचणे किंवा कमी प्रमाणात पोहोचणे, आरोग्य शिक्षणाचा कार्यक्रमात अंतर्भाव न करणे,

या सर्व चुका करणार्‍या अधिकार्‍यांवर आणि कर्मचार्‍यांवर कोणतीही कारवाई न होणे, इत्यादी कारणेही बालमृत्यूसाठी आणि कुपोषणाच्या वाढीसाठी तेवढीच जबाबदार आहेत.

धडक मोहीम म्हणजे काय? कशासाठी?

मेळघाट मित्रच्या धडक मोहीमेची सुरुवातच मुळात कुपोषण आणि त्यामुळे होणारे बालमृत्यू वाचविणे या उद्देशाने झाली. मेळघाटात जास्त बालमृत्यू हे पावसाळ्याच्या दिवसात होतात. हे बालमृत्यू वाचविण्यासाठी “मैत्री” धडक मोहीमेचे आयोजन करते. १९९७ साली या मोहीमेत २६५ स्वयंसेवकांनी उस्फूर्त भाग घेतला होता. ’एकही बालमृत्यू होऊ देणार नाही’ या उद्देशाने दरवर्षी या धडक मोहीमेचे आयोजन केले जाते. दरवर्षी महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी, नोकरी करणारे, व्यावसायिक, महिला, इ. या धडक मोहीमेत सहभागी होतात आणि प्रत्यक्ष गावात राहून अदिवासींसोबत काम करतात. ज्या गावात आपण काम केले आहे त्या गावात पावसाळ्यात होणारे बालमृत्यू वाचविण्यात आपल्याला यश आले आहे. सुरुवातीला पाच गावात सुरु झालेली ही धडक मोहीम सात, नऊ, सोळा आणि आता सत्तेचाळीस गावांपर्यंत पोहोचत आहे. प्रत्यक्ष्य लोकांबरोबर काम, गावात राहून काम करणे आणि बालमृत्यू वाचविण्याबरोबरच आरोग्य शिक्षण करण्यावर या मोहीमेत भर दिला जातो. यासोबतच शिक्षण, शेती, शासकिय योजना यांबद्दलही लोकांना माहीती दिली जाते.

धडक मोहीम पावसाळ्यातच का?

मेळघाटात पावसाळ्यातील परिस्थिती अत्यंत वाईट असते. या दिवसात बालमृत्यू होण्याचे प्रमाणही वाढलेले असते. आजपर्यंअतच्या आमच्या पाहणीमधे असे दिसून आले आहे कि, मेळघाटात वर्षभरामधे जेवढे बालमृत्यू होतात त्यातील ६० टक्के बालमृत्यू फक्त पावसाळ्याच्या दिवसातच होतात. या दिवसात साथीचे आजार वाढलेले असतात. पावसामूळे गावांमधील संपर्कही तुटलेला असतो. त्यामुळे दवाखान्यात जाऊन उपचार घेणे अवघड होते. लहान मुलांच्या बाबतीत लगेच उपचार झाले नाहीत तर बालमृत्यू होण्याचा धोका वाढतो. अशा आजारांवर नियंत्रण ठेवणे आणि लोकांना सोबत घेऊन असे आजार होऊच नयेत म्हणून काम करण्यासाठी मैत्री धडक मोहीमेचे आयोजन केले जाते.

यावर्षीची धडक मोहीम कशी असेल?

गेल्यावर्षी मेळघाटात एकूण ४११ बालमृत्यू झाले आहेत. आणि चिखलदरा तालुक्यातील काटकुंभ प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत गावांमधे गेल्यावर्षी (२०१२-१३) सर्वात जास्त म्हणजे ५७ बालमृत्यू झाले आहेत. त्यामुळे या गावांमधेच धडक मोहीम करण्याचे यावर्षी आम्ही ठरविले आहे. यासाठी दहा गावाम्चे नियोजन केले आहे. प्रत्येक गावात दोन स्वयंसेवक एका वेळी काम करतील आणि एकूण ११ गट काम करतील. 

धडक मोहीम कधी आहे?

 कालावधी: १८ जुलै ते २९ सप्टेंबर, २०१४

• एकूण दिवस:७३

• एकूण बॅचेस : १०

• एका बॅचसाठी लागणारे स्वयंसेवक: ३०

• एकूण स्वयंसेवक : ३००

   धडक मोहीमेत नेमके  काय करायचे आहे?

• सहा वर्षावरील मुलांच्या आजारपणाकडे लक्ष्य देणे.

• एक वर्षाखालील सर्व मुलांच्या घरी दररोज भेट देणे.

• गरोदर स्त्रियांना दररोज भेटणे आणि त्यांचे आरोग्य शिक्षण करणे.

• कुपोषित मुलांच्या घरी भेटी देणे आणि त्यांच्या पालकांना आहाराबद्द्ल मार्गदर्शन करणे.

• गावातील लोकांना सोबत घेऊन सार्वजनिक आरोग्य कार्यक्रम राबविणे.

• साध्या आजारांवर उपचार करणे.

• प्रथमोपचार पध्दती अवलंबविणे.

• शासकिय आरोग्य विभाग आणि अदिवासी यांच्यामधे दुवा साधणे.

काय करायचे? काय करायचे नाही?

 धडक मोहीमेला निघण्यापूर्वी आपल्या घरातील व्यक्तींना पूर्ण माहीती द्या.

• गटप्रमुखाने दिलेल्या सर्व सुचनांचे पालन करणे.

• शिबीरातील पाणी, अन्न, औषधे, स्टेशनरी, इ. चा योग्य वापर करा.

• रोजचे वेळापत्रक तंतोतंत पाळा.

• धडक मोहीमेचे काम करताना कोणत्याही प्रकारचे व्यसन चालणार नाही.

• प्लास्टिक, पाण्याच्या बाटल्या इतरत्र टाकू नका. शिबिरामधे योग्य जागेवर ठेवा.

• अदिवासींना त्यांच्या अंधश्रद्धा, अडाणीपणाबद्दल नावे ठेवू नका, त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा.

• गावातील लोकांना कोणत्याही प्रकारचे अमिष अथवा आश्वासन देवू नका.

• गावातील कोणत्याही व्यक्तीशी वाद घालु नका.

धडक मोहीमेतील रोजचे वेळापत्रक कसे असेल?

• दररोज सकाळी ८ वा. आणि रात्री ८ वाजता प्रार्थना होईल.

• ब्रेकफास्ट झाल्यानंतर प्रत्येकाने नेमून दिलेल्या गावात चालत जायचे आहे.

• गावात नेमून दिलेलीच कामे करावयाची आहेत. आणि केलेल्या कामाची नोंद रजिस्टरमधेच करावी.

• दुपारचे जेवण गावात पोहोचविण्याची सोय केली जाईल.

• संध्याकाळी सहा वाजेपर्यंत शिबिरात पोहोचणे आवश्यक आहे. कामानिमित्त उशीर होणार असेल तर तशी सुचना गटप्रमुखाला देणे आवश्यक आहे.

• रात्रीच्या प्रार्थनेनंतर दिवसभर केलेल्या कामासंदर्भात बैठक होईल.

• रात्री ९ वाजता जेवण आणि त्यानंतर विश्रांती.

• दररोज प्रत्येकाने आपली डायरी लिहिणे बंधनकारक आहे.

धडक मोहीमेला जाताना सोबत कोणकोणते साहीत्य बरोबर घ्यायचे?

आपली पुरेशी कपडे, टॉवेल्स, नॅपकिन्स, चादर,
o कपडे मुलींसाठी: सलवार कुर्ता (No jeans and T-shirt allowed for girls)

• स्वेटर, रेन कोट, छत्री,

o कपडे मुलांसाठी: पॅंट, शर्ट, टी शर्ट, इ.( No Bermuda while working in the village)

• स्वत:ची औषधे, ओळखपत्र, काडेपेटी, मेणबत्या

• डायरी, पेन, वही, टॉर्च, नेल कटर, पाण्याची बाटली

• जेवणासाठी डबा, प्लेट, वाटी, चमचा, चाकू

• चप्पल, ओडोमॉस, साबण, टोपी

• ब्रश, कंगवा, खोबरेल तेल, टूथपेस्ट, प्लास्टिक पिशव्या

• वैद्यकिय महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी Stethoscope आणावा  व रुग्णतपासणीसाठी ईतर उपयोगी साहित्य आणावे.

मला धडक मोहीमेत सहभागी होता येत नाही, तर मी मेळघाटसाठी काय करु शकतो?

मेळ्घाटात काम करणार्‍या चांगल्या स्वयंसेवी संस्थाना आर्थिक, वस्तूस्वरूपात, वेळ देऊन, माहीती देऊन बहुमोल ताकत देऊ शकतात.

शासनावर दबावगट म्हणून काम करू शकतात.

मेळघाटात प्रत्यक्षात येऊन काम करू शकतात. डॉक्टर, शेती विषयातील लोक, अभियंते यांनी त्यांच्या पेशाप्रमाणे काम करायला हरकत नाही.

मेळघाटातील समस्या जाणून घेऊन त्या समस्या अनेक लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करू शकतात.

मेळघाटच्या विविध समस्यांवर, अदिवासी जीवनावर, शास्त्रीय पध्दतीने संशोधन करू शकतात,

ज्याचा फ़ायदा समस्या सोडवण्यासाठी, अदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी होऊ शकतो.

अदिवासी लोकांना बाहेरच्या जगाशी ओळख करुन देऊ शकतात.

मेळ्घाटातील विविध गटांना प्रशिक्षक/ मार्गदर्शक म्हणून काम करू शकतात.

मेळघाटातील यूवक/यूवतींना उच्चशिक्षणासाठी, व्यवसायासाठी किंवा नोकरीसाठी मदत करू शकतात.

मेळघाटच्या इतर समस्या कोणत्या आहेत?

लोकांच्या हाताला काम नाही आणि जर काम मिळालेच तर कामाप्रमाणे दाम मिळेल याची खात्री नाही.

मेळ्घाट्च्या हतरु भागात वीजच नाही. त्यामुळे आपोआप छोटे उद्योगधंदे निर्माणच झाले नाहीत. शिवाय शेतीचाही विकास झाला नाही.

गावांना जोडणारे बारमाही रस्ते नाहीत.

प्राथमिक शिक्षणाची दुरावस्था आहे.

आरोग्य व्यवस्था लोकांपर्यंत पोहोचत नाही.

सावकारांचा पाश आहेच.

लोकांच्या शेतमालाला जवळ बाजारपेठ नाही.

शासनाच्या कल्याणकारी योजना फ़क्त कागदावरच पहायला मिळतात. त्या लोकांपर्यंत पोहोचत नाहीत.

बालमृत्यू आणि कुपोषणाचा प्रश्न सोडवण्यासाठी राजकिय इच्छाशक्तीच नाही.

शासकिय अधिकारी आणि कर्मचार्‍यांचा निष्काळजीपणा आणि कामचुकारपणा.

शेतीमधे उत्पादकता नाही. शासनाचे शेतीसुधार कार्यक्रमाकडे लक्ष नाही.

वीज आणि रस्ते नसल्याने शेतीवर आधारीत उद्योगधंदे नाहीत.

लोकांचा जंगलावरील अधिकार कमी झाल्याने प्राण्यांचे रक्षण होत नाही. त्यामुळे जंगलातील वनौपजांच्या चोरीत वाढ झाली आहे.

“मैत्री” (मेळघाट मित्र) ने समस्या सोडवण्यासाठी काय प्रयत्न केले आहेत?

लोकांपर्यंत शासकीय योजना आणि योजनांची माहीती पोहोचविली.

गावपातळीवर काम करणारे शासकिय कर्मचारी, जसे, शिक्षक, ग्रामसेवक, पटवारी (तलाठी), दवाखान्यातील कर्मचारी यांच्याशी पत्रव्यवहार करुन संवाद साधन्याचा प्रयत्न केला. प्रसंगी त्यांच्या वरीष्ठांकडे तक्रारीही केल्या.

समस्यांविषयी वृत्तपत्रामधे आणि टी. व्ही. वर बातम्याही पाठवल्या.

विविध विषयांची प्रशिक्षणे आणि बैठकांच्या माध्यमातून लोकजागृती केली.

प्रत्यक्ष लोकांसोबत राहून काम केले.

प्रत्यक्ष बालमृत्यू वाचवण्यासाठी यशस्वी धडक मोहीम कार्यक्रमाचे आयोजन.

आरोग्य मैत्रिणींच्यामार्फ़त आरोग्य शिक्षणाचा प्रसार आणि उपचारही.

बोको मित्रांमार्फ़त अभ्यासवर्ग आणि शिक्षणाचे काम.

रुईपठार या गावात पिण्याच्या पाण्याची आणि वीजेची कायमस्वरूपी सुविधा केली.

डोमी या गावात प्रत्येक घरात उजेडाची(प्रकाशाची) सोय केली.

कुटीदा आणि सुमिता या दोन गावात पाणलोट क्षेत्र विकासाचे काम केले.

चिलाटी आणि सुमिता या दोन गावात खतखड्डे काढले. परसबागा तयार केल्या.

कुटीदा या गावात संडासचे बांधकाम केले. लोकांकडून संडासचा वापर सुरु झाला.

लोकांना रेशनिंगचे धान्य वेळेवर मिळ्ण्यासाठी सतत प्रयत्न केले.

रोजगार हमी योजनेअंतर्गत कामे मिळवून देणे आणि कामाचे पैसे वेळेवर मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला.

लोकांना त्यांच्या हक्काचे रेशनिंग मिळवून दिले.

शासनाकडून लोकांना वेळोवेळी मिळणारी मदत लोकांना मिळ्वून दिली. अतिवृष्टी किंवा इतर नुकसानींचे पंचनामे करून मदत मिळेपर्यंत त्याचा पाठपुरावा केला.

लोकांना मोफ़त जातीचे दाखले काढुन दिले.

मोर्चा, आंदोलने यांच्या माध्यमातून रस्ते, अतिक्रमित जमीन यांचा प्रश्न मार्गी लावला.

चिलाटी येथे विविध विषयांवर प्रशिक्षणांचे आयोजन केले.

मेळघाटातील समस्या सोडवण्यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतील?

लोकांच्या हाताला हवं तेंव्हा काम आणि कामाप्रमाणे दाम द्यायलाच हवं. लोकांना भीक देणं बंद करायला पाहीजे.

प्रचंड राजकिय इच्छाशक्ती हवी. यासाठी यूवकांची/यूवतींची संघटना बांधायला हवी. चांगल्या यूवकाना राजकारणात उतरवायला हवं.

भ्रष्टाचार पूर्ण थांबायला हवा. त्यासाठी आर. टी. आय. सारख्या कायद्याची योग्य प्रकारे

माहीती करून घेऊन त्याचा वापर करायला हवा.

Media ने समस्या चर्चेत ठेवायला ह्व्यात. त्यांचा पाठपूरावा करायला हवा.

प्रत्येक समस्या समजापुढे योग्य प्रकारे मांडली पाहीजे.

Advertisements

One Response to FAQ’s मराठी मध्ये

  1. manish s. solanke says:

    i feel like that u start the group for my dreem. i have kin interest in this work and i join to u just after some days u start a working platform for me. thanks.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: